वांबोरी, सिद्धटेकला ‘मुंबई रिटर्न’ करोनाबाधित

* नव्या करोनाबाधितांच्या पुणे-मुंबई-औरंगाबाद कनेक्शनमुळे नगर जिल्हा हादरला *जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोचली 78 वर

नगर  – बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या चार जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद आदी ठिकाणांहून जिल्ह्यात आल्या होत्या, तर संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका करोनाबाधित रुग्णाचा शनिवारी (दि.23) रात्री नाशिक येथे मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता सात झाली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी व कर्जत तालुक्यातील सिद्धटेकला ‘मुंबई रिटर्न’ नेच भवाडा दिला असून, जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या 78 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी 19 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात या व्यक्ती बाधित आढळून आल्या. यातील एक 36 वर्षीय व्यक्ती 17 मे रोजी मुंबईहून राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे आली होती. दुसरी 60 वर्षीय बाधित व्यक्ती तुर्भे, मुंबई येथून 22 मे रोजी कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे आली होती.

तिसरी 32 वर्षीय बाधित व्यक्ती औरंगाबाद येथून 20 मे रोजी श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे आली होती. नेवासा बुद्रुक येथे 22 मे रोजी उल्हासनगर येथून आलेली 60 वर्षीय महिलाही बाधित आढळून आली आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या घाटकोपर येथील महिलेचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, नाशिक येथे उपचार घेत असलेल्या संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका रुग्णाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. नाशिक येथे कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे ते वडील आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.