गोंदवले -लोधवडे (ता. माण) येथील 67 वर्षीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने लोधवडेकरांनी त्याची धास्ती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर माणच्या तहसीलदार बी. एस. माने व सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी गावाला भेट दिली. लोकांना सूचना देऊन इतर गावात त्यांचा संपर्क होणार नाही, यासाठी गावात येणारे प्रमुख रस्ते सील करण्यात आले.
लोधवडे गावात दि. 17 रोजी आलेल्या एका कुटुंबातील वयोवृध्द व्यक्तीला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. या वृद्धाला पूर्वी काही व्याधी होत्या. सध्या होत असलेला त्रास हा त्याच व्याधींचा असेल म्हणून त्यांच्या एका नातेवाईकाने त्या वृद्धाला पुसेगावला उपचारासाठी नेले होते. तिथे एका डॉक्टरकडून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तिथून लोधवडेमध्ये आल्यावर त्रास कमी झाला नाही. ही गोष्ट कुटुंबातील व्यक्ती इतर ग्रामस्थांना सांगत होती. मात्र, हे कुटुंब मुंबईवरून आल्याने त्यांच्याकडे कोणीही गेले नाही. त्या वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस पाटील अनिल लोखंडे पाटील यांनी त्याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर वृद्धाचा मृतदेह खासगी गाडीने फलटण येथे तपासणीसाठी नेला.
तपासणी करून त्यांच्यावर तिथेच अंत्यसंस्कार झाले. त्या वृद्धाचा स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला. शुक्रवारी रात्री उशीरा त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. क्षणात लोधवडेचे वातावरण तंग झालं. गाव सुनसान झाले. लोकांमध्ये घबराट आहे. तहसीलदार माने, राजकुमार भुजबळ, डॉ. लक्ष्मण कोडलकर यांनी लोधवडे येथे भेट देऊन सरपंच अपर्णा नष्टे यांच्याशी संवाद साधत लोकांना मार्गदर्शन सूचना केल्या. लोधवडे आणि वाडीवस्तीवरील लोकांना स्पीकर वरून सूचना केल्या त्याचबरोबर त्या वृद्धाच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील लोकांना माध्यमिक विद्यालयात ठेवण्यात आले. अधिक सुरक्षा म्हणून त्या कुटुंबातील सात आणि इतर दोन अशा नऊ लोकांना फलटण येथे तपासणीसाठी नेण्यात येणार असल्याचे तहसीलदार माने यांनी सांगितले.