पुणे – येत्या काळात “फास्ट टॅग’ नसणारी वाहने टोलनाक्यावरील “फास्ट टॅग’ लेनमधून गेल्यास त्यांना दुप्पट टोल आकारण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून जाहीर करण्यात आले.
टोलनाक्यावरील वाहनांच्या रांगा कमी व्हाव्यात आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी वाहनचालकांकडून “फास्ट टॅग’द्वारे टोल घेण्यात येत आहे. यासाठी टोलनाक्यांवर “फास्ट टॅग’साठी वेगळी लेन आहे. तर इतर वाहनांसाठी म्हणजेच कॅशधारकांसाठी हायब्रीड लेन आहे. या लेनमुळे “फास्ट टॅग’ असणारी वाहने टोल नाक्यावरून लवकर बाहेर पडत होती.
याउलट हायब्रीड लेनवर रांग लागत असल्याने वाहनधारकांना अधिक वेळ थांबावे लागत होते. अनेकदा “फास्ट टॅग’ नसलेला वाहनचालक “फास्ट टॅग’ लेनमधून प्रवास करत होते. यापुढील काळात अशाप्रकारे वाहनचालकाने प्रवास केल्यास संबंधितांना टोलसाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत.सुरुवातीला 1 डिसेंबर 2019 पासून टोलनाक्यांवर “फास्ट टॅग’ बंधनकारक केले होते. मात्र, “फास्ट टॅग’ नसणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली.