कराड -कराड शहरातील मंगळवार पेठेत करोनाबाधित रूग्ण सापडल्याने नगरापालिका प्रशासनाने तो संपूर्ण भाग सील केला होता. तसेच, त्या भागातील नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या होता. मात्र, अनेकजण या नियमांचे उल्लंघन करून मंगळवार पेठ परिसरात इतरत्र फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर चाप बसविण्यासाठी खुद्द मुख्याधिकारी यशवंत डांगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तेथे तळ ठोकला. तसेच संबंधित भागात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली.
कराड शहराची लोकसंख्या सुमारे 1 लाख इतकी आहे. शहरात करोना बाधितांची संख्या वाढू नये यासाठी पालिका प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे. शहरातील प्रत्येक भाग निर्जंतूकीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील मंगळवार पेठ परिसरात गत आठवड्यात करोना बाधित रूग्ण सापडल्याने संबंधित भाग सूक्ष्म प्रतिबंधीत करण्यात आला आहे. तो भाग वगळता इतरत्र सर्व सुविधा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
मंगळवार पेठ परिसरातील लोक एकमेकांच्या संपर्कात आल्यास मलकापूर सारखी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पालिकेकडून योग्य दक्षता घेतली जात आहे. असे असतानाही संबंधित भागातील अनेक नागरिक एकत्र येऊन गप्पा मारत बसत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले. पालिका कर्मचाऱ्यांच्या दटावणीलाही नागरीक घाबरत नसल्याचे लक्षात आले.
त्यामुळे खुद्द मुख्याधिकारी यशवंत डांगे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी संबंधित परिसरात तळ ठोकला. संबंधित भागात इतरत्र फिरणाऱ्यावर तसेच घोळके करून बसणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. कराड शहर करोनामुक्त होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच संबंधित भागात गस्त वाढविणार असल्याचेही डांगे यांनी सांगितले.