नवी दिल्ली : पंजाबमधील लुधियानामध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व जवान श्रमिक ट्रेनमध्ये तैनात होते. देशभरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी श्रमिक ट्रेन चालवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात श्रमिक ट्रेन चालवण्यात येत आहेत
दरम्यान, पंजाबमध्ये याआधी नांदेड येथून परतलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच आता श्रमिक ट्रेनमध्ये तैनात असलेले जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे पंजाब राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान, देशभरात लॉकडाऊनमुळे 17 मेपर्यंत रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवण्यात येत आहे. यामध्ये काही निवडक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या ट्रेनमधून इतर कोणीही प्रवास करू शकत नाही.
या ट्रेनमधून लॉकडाऊनमुळे अडकलेले मजुर, विद्यार्थी, भाविक आणि पर्यटक यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यांपैकी ज्यांना राज्य सरकारकडून परवानगी देण्यात येणार त्याच व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत.