खरेदीसाठी नागरिकांची गर्दी : परिसर हॉटस्पॉट जाहीर करण्याची मागणी
कात्रज – कात्रज परिसरातील सुंधामाता व अंजनीनगर परिसरात सापडलेल्या 3 करोनाबाधित रुग्णांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कात्रजजवळील भिलारेवाडी येथेही आणखी 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे कात्रज परिसर करोना हॉटस्पॉट जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
कात्रज, संतोषी मातानगर, अंजनीनगर, दत्तनगर, सच्चाई माता मंदिर परिसरात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे तेथे करोनाचा फैलाव वेगाने होऊ शकतो. याकरिता हा परिसर पूर्णपणे सील करावा. पोलीस प्रशासनाने कात्रज परिसरामध्ये विनाकारण रस्त्यांवर गर्दी करणारे नागरिक व भाजीविक्रेते तसेच दुकानदार यांना समज देऊन दुकाने बंद करण्यास सांगितले.
तसेच, परिसरात गस्त वाढवून संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यावेळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैलम् चिवडशेट्टी यांनी सोमवारी कात्रज परिसरात कारवाई केली. तसेच, काही ठिकाणी रस्ते बॅरिकेट टाकून वाहनांसाठी बंद केले. त्यानंतरही नागरिक गंभीर नसल्याचे दिसत आहे. कात्रज परिसरात गेल्या दीड महिन्यांत एकही करोना रुग्ण आढळला नव्हता पण दोन दिवसांपूर्वी 3 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने हा भाग सील
करावा, अशी मागणी समाजिक कार्यकर्ते ऍड. संभाजीराजे थोरवे यांनी केली.
धनकवडी भागात लॉकडाऊनचे उल्लंघन
शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांमध्ये धनकवडी, बालाजीनगर या भागाचा समावेश असल्यामुळे तो शंभर टक्के बंद ठेवणे अपेक्षित असताना दुकानदारांकडून आदेशाचे उल्लंघन होत आहे. सोमवारी सकाळपासूनच परिसरातील सर्व दुकाने उघडण्यात आली होती. तसेच, भाजी तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे कुठेही पालन होताना दिसून आले नाही. त्यामुळे नागरिकांना लॉकडाऊनचा विसर पडल्याची स्थिती होती. धनकवडी, बालाजीनगर, चैतन्यनगर परिसरात सध्यातरी करोनाचा रुग्ण सापडला नसला तरी पूर्वी या भागात रुग्ण सापडल्याने हा भाग अजून काही दिवस सील करण्यात आला आहे.