नवी दिल्ली – केंद्रीय क्रीडा पुरस्कार यंदा होणार का याबाबतच्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. करोनाचा धोका असताना स्पर्धा स्थगित झाल्या असल्या तरीही पुरस्कार मात्र दरवर्षीप्रमाणे दिले जातील, असेही मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे.
चीनमुळे जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या वाढत्या धोक्यामुळे भारतातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील अनेक मानाच्या म्हणजे ऑलिम्पिक, विम्बल्डन टेनिस अशा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत तर काही स्पर्धा रद्दच झाल्या आहेत. अशीच परिस्थिती भारतातही आहे. त्यामुळेच यंदा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता.
दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पुरस्कार दिले जाणार असल्याचे स्पष्ट करताना इच्छुक खेळाडूंनी क्रीडा मंत्रालयाकडे आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवावेत असे जाहीर करण्यात आले आहे.
क्रीडा मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केलेल्या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तसेच हे अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.