नवी दिल्ली : करोनाची सुरुवात ज्या देशातून झाली त्या चीनवर जगातून एकीकडे माहिती लपवल्यामुळे टीका सुरु आहे. तर दुसरीकडे उत्तर कोरियाने मात्र चीनची स्तुती केल्याचे समोर आले आहे. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी करोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल चीनचे कौतुक केले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
किम जोंग उन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना एक व्यक्तीगत संदेश पाठवला आहे. त्यात करोनावर नियंत्रण मिळवल्याबद्दल जिनपिंग यांचे त्यांनी कौतुक केले आहे. चीन हा उत्तर कोरियाचा अत्यंत जवळचा, भरवशाचा मित्र आहे. उत्तर कोरियाचा व्यापार चीनवर अवलंबून आहे.
चीन ही एकप्रकारे उत्तर कोरियाची लाइफलाइनच आहे. त्यांचा ९० टक्के व्यापार चीनवर अवलंबून आहे. चीनमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे चीन बरोबर पुन्हा व्यापार सुरु करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील आहे असे तज्ज्ञांनी सांगितले. करोनामुळे मागच्या काही महिन्यात चीन आणि उत्तर कोरियामधील व्यापार मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता.
चीनने करोनाच्या फैलावाची वेळीच माहिती दिली नाही असा चीनवर आरोप होत आहे. चीनने वेळीच कल्पना दिली असती तर करोनाचा फैलाव रोखता आला असता असे अनेक देशांना वाटते. आज करोनामुळे जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला असून अर्थचक्र ठप्प झाले आहे. बेरोजगारीचे मोठे संकट जगासमोर आहे. पण या परिस्थितीतही उत्तर कोरिया, पाकिस्तान हे देश चीनच्या पाठीशी ताठपणे उभे असल्याचे दिसत आहे.