विश्रांतवाडी (प्रकाश बिराजदार) : करोनासारख्या महामारीच्या संकटसमयी “मदत नव्हे कर्तव्य” या संकल्पनेतून विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्यावतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. टिंगरेनगर, विश्रांतवाडी येथील वडारवाडी, चव्हाण चाळ, काचीवस्ती, एकतानगर, कळस, रामनगर, बर्माशेल, चौधरीनगर, मुंजाबावस्ती, धानोरी तसेच पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील काही भागांमध्ये सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत जीवनावश्यक वस्तू वाटण्यात आल्या.
पुणे इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष हुलगेश चलवादी, राष्ट्रवादी युवती वडगावशेरी मतदारसंघाच्या अध्यक्ष तथा स्कुलच्या उपाध्यक्षा रेणुका चलवादी, आकाश चलवादी व त्यांचे सहकारी यांनी परिसरातील विविध भागात वस्तूंचे वाटप केले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांसमोर रोजगार नसल्याने अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या जाणून घेत या संकटकाळात सामाजिक बांधिलकीचा एक वेगळा आदर्श “पुणे इंटरनॅशनल स्कूल” या संस्थेने घालून दिला आहे.
कर्तव्य भावनेतून केली मदत: चलवादी
करोनासारख्या महामारीमुळे देशासह संपूर्ण जग संकटात आहे. या संकटकाळात अडचणीत असलेल्यांना मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य निभावण्याच्या उद्देशाने गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलला असल्याचे हुलगेश चलवादी व रेणुका चलवादी म्हणाले. तसेच या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करत आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी, अशी विनंती देखील त्यांनी केली.
कुणीही उपाशी राहू नये याकरिता स्कुलच्या पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली धडपड पाहून सर्व गरजूंनी आभार मानत समाधान व्यक्त केले. यापूर्वी स्कुलच्यावतीने केरळ, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना देखील मदत केली होती.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्यापनाचे धडे देण्याबरोबरच अनेक विधायक उपक्रम स्कुलतर्फे वर्षभर राबविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना देखील भावी वाटचालीत कर्तव्याची जाणीव होऊ शकते.