शिरवळ -खंडाळा तालुक्यातील विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या कोव्हिड-19 च्या 30 संशयित लोकांची यादी सोशल मीडियावरून व्हायरल केल्याप्रकरणी नागेश्वर परिवार बावडा या व्हॉटस्ऍप ग्रुपचे ऍडमिन नितीन लक्ष्मण पवार (वय 42), संदीप शिवाजी जाधव (वय 42) व सदस्य सचिन मस्कू धापते (वय 35, तिघे रा. बावडा, ता. खंडाळा) यांच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोव्हिड19 बाधित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या खंडाळा येथील काही व्यक्तींचा खंडाळा तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या पथकाने शोध घेऊन त्यांची तपासणी शनिवारी (दि. 2) केली.
त्यापैकी 26 लोकांची हाय रिस्क व चार लोकांची लो रिस्क अशी नोंद करून यादी तयार करण्यात आली होती. या संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
ही यादी बावडा येथील सचिन धापते याने कोठून तरी मिळवली. करोना संशयित व बाधितांची नावे जाहीर करायला कायद्याने मनाई आहे. या आदेशाचे उल्लंघन करून धापते याने आपल्या मोबाइल क्रमांक 9822078418 वरून ही यादी नागेश्वर परिवार बावडा या व्हॉटस्ऍप ग्रुपवर काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता प्रसारीत केली. व्हॉटस्ऍप ग्रुपवर केवळ ऍडमिन मेसेज पाठवू शकेल (ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज) असे सेटिंग कार्यान्वित करण्याची सूचना असूनदेखील या व्हॉटस्ऍप ग्रुपचे ऍडमिन नितीन पवार व संदीप जाधव यांनी हे सेटिंग कार्यान्वित केले नव्हते. त्यामुळे गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार तपास करत आहेत.