मुंबई – ‘पान सिंह तोमर’, ‘मकबूल’, ‘पिकू’, ‘कारवाँ’, ‘मदारी’ अशा अफलातून चित्रपटांतून अभिनेता इरफान खान जेव्हा जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले, तेव्हा प्रत्येक वेळी ते नव्याने काय घेऊन आले आहेत, हाच प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करुन गेला. प्रत्येक पात्रासह इरफान वेळोवेळी काहीतरी सांगून जात होते. बरं त्यांनी साकारलेल्या भूमिकांची ताकदही इतकी की त्यांना पुन्हा भेटण्याची इच्छा झाल्यावाचून राहत नसे. अभिनेते इरफान खान यांचं आज वयाच्या ५४व्या वर्षी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात कर्करोगाने निधन झालं.
त्यांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी सिनेसृष्टीत निर्माण झाल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यांचे बॉलिवूडमधले हिंदी भाषिक सिनेमे आणि त्यातल्या त्यांच्या व्यक्तिरेखा तर विशेष गाजल्याच, पण त्यासोबतच त्यांनी काही इंग्रजी भाषिक सिनेमांमध्ये देखील केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. २००७ पासून त्यांचा अभारतीय भाषांमधल्या अभिनयाचा प्रवासा सुरु झाला. द दार्जिलिंग लिमिटेड या सिनेमामध्ये इरफान खान यांनी एक छोटीशी व्यक्तीरेखा साकारली होती. दरम्यान इरफान खान यांनी बऱ्याच अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यापैकी काही.