पिंपरी – करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर निर्बंध घातले आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. असे असताना तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या मार्गाने विक्री सुरू असून नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे चित्र शहरात विविध ठिकाणी पहावयास मिळत आहे.
करोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून विविध स्वरुपातील उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील सर्व पानटपऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. असे असताना काही महाभाग नियमांना धाब्यावर बसवून आंबटशौकिनांना गुटखापुड्या, सिगारेट, तंबाखू व चुना पुरवत आहेत. त्यासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. शहरातील अनेक टपऱ्यांमधून तंबाखूजन्य पदार्थ पुरविले जात आहेत. त्यासाठी टपऱ्यांच्या मागच्या दरवाज्याचा वापर केला जात आहे. तर काही दुकानदारांनी घरपोच सेवा देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी जादा पैसेही आकारले जात आहेत. जादा पैसे देऊन काही नागरिक आपले व्यसन पूर्ण करत आहेत.
विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यावर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. मात्र याउपरही सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे.
महापालिकेच्या पासचा गैरवापर
तंबाखूजन्य पदार्थ पुरविणारे अनेक महाभाग महापालिकेने समाजसेवक म्हणून दिलेल्या पासच्या आधारे शहरात फिरत आहेत. नगरसेवकांच्या मागेपुढे फिरवून या महाभागांनी पास मिळविले आहेत. कोणतीही शहानिशा न करता दिलेल्या पासचा गैरवापर चालल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात रंगली आहे.