मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. इरफान खानची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मंगळवारी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, लाइफ इन अ मेट्रो, पानसिंग तोमर, द लंचबॉक्स, हैदर, गुंडे, पिकू, तलवार, कारवां, हिंदी मीडियम यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफान खान यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. बॉलिवूडसोबतच त्यांनी हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.