सातारा (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून मोळाचा ओढा या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना वीजेच्या खांबाखालीच अंधारात रात्रभर पहारा द्यावा लागत होता. ही बाब निदर्शनास येताच दै. “प्रभात’ने “अंधारात पहारा देणाऱ्या पोलिसांच्या जीवाला धोका’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित विभागाने या ठिकाणी असणाऱ्या विद्युत खांबावर बल्ब बसविल्याने मोळाचा ओढा परिसर प्रकाशमय झाला आहे. दरम्यान, या ठिकाणी बल्ब बसविल्याने नागरिकांबरोबरच बंदोबस्तावरील पोलिसांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.
करोनामुळे गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात संचारबंदी आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असा आदेश जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर दिवसरात्र तगडा पोलीस बंदोबस्त आहे. शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या मोळाचा ओढा याठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना दिवसभर फारशा अडचणींचा सामना करावा लागत नव्हता, मात्र रात्रीच्या वेळी याठिकाणी वीजच नसल्याने पोलिसांना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत होते.
परिसरात असणाऱ्या झाडाझुडपांमुळे येथे रात्रीच्यावेळी साप निघाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. त्यातच रात्रीच्यावेळी येणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यावर लावलेले बॅरिकेटस्ही दिसत नव्हते आणि बंदोबस्तावरील पोलीसही, दुर्दैवाने एखादे वाहन भरधाव वेगात आल्यास अपाघाताच्या घटनेचीही शक्यता नाकारता येत नव्हती. एकंदरीतच विजेअभावी मोळाचा ओढा येथील बंदोबस्त पोलिसांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब निदर्शनास आणून देणारे वृत्त दै.”प्रभात’ने प्रसिद्ध केले. त्याची दखल घेत संबंधित विभागाने याठिकाणी विजेच्या खांबावर बल्ब बसविले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे.