अकोले -तालुक्यातील तांभोळ येथील एका करोना संशयीत रुग्णाला तपासणीसाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. दरम्यान, अकोले तालुक्यात आतापर्यंत एकही करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजित गंभीरे यांनी सांगितले.
तांभोळ येथील 19 वर्षांचा रुग्ण परगावाहून तेथे आला. मागील तीन दिवस त्याला सर्दी, थंडी-ताप, अशी लक्षणे दिसून येत होती. ही माहिती अकोले येथे आरोग्य विभागाला कळाल्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेतले गेले आणि नगर येथे हलवले गेले आहे, असे डॉ. गंभीरे यांनी सांगितले. त्याबाबतचा अहवाल उद्या येणे अपेक्षित आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. थंडी-ताप, सर्दी अशी लक्षणे जरी त्याच्यामध्ये असली, तरीही लोकांनी घाबरून जाऊ नये, अशा प्रकारचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.
डॉ. गंभीरे म्हणाले, 18 हजार 306 लोकांना होम क्वारंटाईन केले गेले होते. त्यापैकी फक्त 550 रुग्ण सध्या होम क्वारंटाईनमध्ये शिल्लक राहिले आहेत. बाकीच्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईनपासून मुक्त करण्यात आले, आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, अकोले तालुक्यात 37 संभाव्य रुग्ण म्हणून करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासले गेले. परंतु त्यामध्ये समाधानाची बाब अशी की एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. उद्या तांभोळच्या युवकाचा तपासणी अहवाल हाती आल्यानंतर त्याबाबत भाष्य करणे उचित ठरेल.
जनतेने घरातच थांबावे. घरातून बाहेर पडल्यानंतर सामाजिक अंतर ठेवून सर्व व्यवहार सुरू ठेवावे. गर्दी टाळावी. पुणे किंवा मुंबईहून आलेल्या कोणत्याही स्थानिक ग्रामस्थांची माहिती ग्रामपंचायतीला किंवा आरोग्य व्यवस्थापन समितीचे सदस्य सरपंच, पोलीस पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना द्यावी, असे सांगून डॉ. गंभीरे म्हणाले, बाहेरून घरी जेव्हा पोहोचाल, तेव्हा आपले हात-पाय स्वच्छ धुवावेत. शक्यतो कोणत्याही साबणाचा वापर करावा. सॅनिटायझरचा वापर करावा. पण स्वच्छतेबाबत कटाक्षाने स्वतः स्वतःला जपावे, असे जनतेला आवाहन केले आहे.