म्हसवड -करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करुन परजिल्ह्यातून आलेल्या 82 नागरिकांना 1 लाख 14 हजार 800 रुपये तर विनाकारण दुचाकी फिरवणाऱ्या 144 दुचाकीस्वारांवर 36 हजार 600 रुपये दंडाची कारवाई म्हसवड न्यायालयाचे न्यायाधीश कोल्हापुरे यांनी केली आहे. ही कारवाई आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून परराज्य तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक गोष्टी वगळत इतर कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कडक पावले उचलत म्हसवड शहरात कायद्याचे उल्लंघन करुन विनाकारण दुचाकी फिरवणाऱ्यांवर तसेच परजिल्ह्यातून जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी संतोष बागल यांनी सपोनि गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.