विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : कोरोनाचा फैलाव झाल्यापासून आता पर्यंत एकही रुग्ण नसल्यामुळे सर्वात सुरक्षित असा लोहगाव चा भाग समजला जात होता. मात्र लोहगाव मध्ये दोन कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याने नागरिकांमध्ये सर्वत्र भितीचे वातावरण असून लोहगावकर सतर्क झाले आहेत.
महापालिकेच्या वतीने रुग्ण सापडलेल्या ठिकाणी औषध फवारणी केली असून त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना आयसोलेशन मध्ये ठेवले असल्याची माहिती सहाय्यक महापालिका आयुक्त राजेश बनकर यांनी दिली. दरम्यान नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात अंतर्गत कोरोना रुग्णांची संख्या १२ वर जाऊन पोहचली आहे.
बनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगावतील माळवाडी परिसरात पुण्याच्या ताडीवाला भागातून एक कुटूंब रहावयास आले होते. या कुटुंबाच्या ताडीवाला भागातील नातेवाईकांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्या रुग्णांच्या संपर्कात लोहगावात रहाणारे सहा जण आले होते. त्यांची कोरोनाची तपासणी केली असता सहा पैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह तर चार जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटीव्ह आलेल्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून निगेटिव्ह आलेल्याना आयसोलेशन करण्यात आले आहे. रुग्ण सापडलेल्या भागात औषध फवारणी करून निर्जंतुकिकरण करण्यात आले आहे. परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आठवडा भर स्वयंस्फूर्तीने बंद दरम्यान, लोहगावात पहिल्यांदाच रुग्ण सापडल्याने महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व नागरिक सतर्क झाले आहेत. प्रशासनाला सहकार्य करून, पुन्हा आठवडाभर किराणा दुकान, भाजी, चिकन-मटण दुकान स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे आवाहन समस्त लोहगावकर नागरिकांनी केले आहे.