जगासह देशातही करोना विषाणूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूचा परिणाम सर्वसामान्य माणसापासून देशाच्या अर्थव्यवस्थेवरही दिर्घ काळ जाणवणार असल्याचे सद्य परिस्थितीवरून दिसून येत आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीलाही याचा जबदरस्त फटका बसला आहे. करोना व्हायरसमुळे अक्षय कुमारचा “सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंहचा “83′ या चित्रपटांचे प्रदर्शन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
आता आमीर खानच्या आगामी “लाल सिंह चढ्ढा’लाही करोनाचे ग्रहण लागले आहे. यात आमीरसह करिना मुख्य भूमिका साकारत असून तो ख्रिसमसला प्रदर्शित होणार होता. मात्र, त्याची रिलीज डेट पुढील वर्षपर्यंत पोस्टपोन करण्यात आली आहे.
चित्रपटाचे लेखक अतुल कुलकर्णी म्हणाले, हा चित्रपट वर्षाअखेर डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचा आमचा प्लॉन होता. परंतु तो यंदा नव्हे, तर पुढील वर्षी प्रदर्शित होवू शकेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले असून हॉलीवुडमधील “फॉरेस्ट गंप’चा हा हिंदी रिमेक आहे.
यात आमीरसह करीना कपूर-खान, मोना सिंह आणि साउथ सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिका साकारत आहे. दरम्यान, देशात करोना व्हायरसचा कहर सुरूच असल्याने अनेक चित्रपटांची रिलीज डेट्स रद्द करण्यात आल्या आहे. या पार्श्वभूमीवर “लाल सिंह चढ्ढा’चे निर्माताही प्रदर्शनाबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. सध्या या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.