पारनेर -पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे हातभट्टी दारू अड्ड्यावर पारनेर पोलिसांनी छापा टाकून 12 हजार रुपयाचे दारू तयार करण्याचे साहित्य नष्ट केले. पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील दारूभट्टी निघोज पोलिसांनी उद्धवस्त केली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या पथक पाठवून कोहकडीच्या काटवणातील ही दारुभट्टी नष्ट केली.
पोलिसांची चाहुल लागताच भट्टी मालक कुकडी नदीपात्रातून शिरूरकडे पसार झाला. सागर महादू गव्हाणे या दारूभट्टी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पो. कॉ. दत्तात्रय चौगुले, पो.कॉ. शेलार, वैभव सालके यांनी भाग घेतला. पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे पुढील तपास करीत आहेत.
या कारवाईबद्दल दारूबंदी चळवळीकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 27 दिवसांपासून लॉकडाऊनचा फायदा घेत दारूचा खप मोठ्या प्रमाणात वाढला होता. निघोज व परिसरातील चार ते पाच गावांमध्ये सरमाडी दारू बनवणारे कारखाने जोरात काम करीत असून दररोज हजारो लिटरची दारु परिसरात ड्रम माध्यमातून आणली जाते. पहाटे पाच ते सहा दरम्यान ही वाहतूक दुचाकीवरुन होत असल्याने कुणाच्याही लक्षात ही बाब येत नाही.