सातारा -लॉकडाऊनच्या काळात लोकांची अडचण दूर करण्यासाठी व मदतीसाठी सुरू केलेल्या 1077 या हेल्पलाइनवर 1145 जणांनी फोन केले असून त्यापैकी बहुतांश तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. करोनाच्या संसर्गामुळे सातारा जिल्हा नव्हे तर, सारं जग हे अस्थिर झाले आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी जिल्हा लॉकडाऊन आहे. यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेसह विविध यंत्रणा प्रयत्न करीत आहेत.
शासनाच्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने 1077 ही हेल्प लाईन सुरु केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांना सुविधेबरोबर अडचणी सोडविण्याचे काम केले जात आहे. आतापर्यंत जवळपास 1145 लोकांचे फोन आले, त्यातील बहुतांश लोकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले आहे. रेशन पुरवठ्याची नागरिकांना अद्ययावत माहिती, रेशनसंदर्भात तक्रार नोंदवून निराकरण करणे, रेशन दुकानदार फसवणूक करीत असल्यास त्याची तक्रार नोंदविणे व संबंधित अधिकाऱ्याला कळविणे, परराज्यातील कामगारांना धान्य पुरवठा, ज्येष्ठ नागरिकांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा, अपंग नागरिकांना दैनंदिन जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणे. अशी विविध सुविधा 1077 या हेल्पलाईनद्वारे पुरविण्यात येत आहेत.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याकरिता माहिती पुरविणे, जिल्ह्यातील नोंदणीकृत खासगी डॉक्टर, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून करोनाबाधितांची माहिती फोन व एसएमएसद्वारे घेऊन जिल्हा प्रशासनाला कळविण्याचे कामही या हेल्पलाइनद्वारे केले जात आहे. जिल्ह्यातील 167 नागरिकांनी, 172 परप्रांतीयांनी, 49 जणांनी नोंदणी, 29 जणांनी औषधांसाठी, 253 वाहतुकीसंदर्भात पास मिळण्यासाठी, 351 रेशनकार्ड संदर्भात, 124 इतर अशा एकूण 1145 नागरिकांनी हेल्पलाइनवर संपर्क साधला आहे.
समुपदेशन राज्यातील पहिला उपक्रम
करोनासंदर्भात घाबरुन जाऊ नये, यासाठी नागरिकांना मानसिक आधार व समुपदेशन देण्याची यंत्रणाही प्रशासनाने फोन कॉलद्वारे राबविण्यास सुरुवात केली केली आहे. हा राज्यातील पहिला उपक्रम आहे. यासाठी अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींनी शासन यंत्रणेस हातभार दिला असून सातारा येथील खासगी कंपनीने देखील कॉल सेंटरचे काम हाती घेतले आहे. नागरिकांच्या काही तक्रारी व माहिती मिळण्यासाठी 1077 या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.