वाघोली -खासगी लॅबमध्ये करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या वाघोलीतील संशयित रुग्णाच्या कुटुंबातील तिघे व त्याच्या सतत संपर्कात असणाऱ्या मित्राचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. नायडू रुग्णालयात चौघांच्या केलेल्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राने कळविल्यानंतर असंख्य वाघोलीकरांचा जीव अक्षरशः भांड्यात पडला. चौघांचा रिपोर्ट येईपर्यंत गॅसवर असणाऱ्या वाघोलीकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. चौघांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार आहे.
वाघोली येथील गायरान परिसरामध्ये एका 45 वर्षीय व्यक्तीचा करोनाचा रिपोर्ट खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर वाघोलीतील सर्वच यंत्रणांची झोप उडाली होती. हा रुग्ण झोपडपट्टी परिसरातील असल्याने सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत, लोणीकंद पोलीस व वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राने पाऊले उचलली आहेत. रुग्णाचे घर व परिसरामध्ये औषध फवारणी करून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
खासगी लॅब मध्ये पॉझिटिव्ह आलेला संशयित रुग्ण व त्याच्या कुटुंबातील तिघे, सतत संपर्कात आलेला रुग्णाचा मित्र, असे एकूण पाच जणांना उपचार व तपासणीसाठी नायडू रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. संशयित रुग्ण वास्तव्य करीत असलेली घरची परिस्थिती गंभीर असल्याने सर्वांचेच चौघांच्या रिपोर्टकडे लक्ष लागले होते. चौघांचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा, अशी इच्छा स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत होते. अखेर चौघांचे रिपोर्ट गुरुवारी (दि.16) निगेटिव्ह आल्याचे वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्राने कळविल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्यांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले जाणार आहे. संशयित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कात आलेल्या जवळपास 42 व्यक्तींना वाघोलीमध्ये क्वारंटाइन करण्याची शक्यता आहे.
संशयित रुग्ण नायडूत उपचारासाठी दाखल
खासगी लॅबचा करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट ग्राह्य धरून वाघोली परिसरामध्ये आढळलेल्या संशयित रुग्ण नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याचा शासकीय रिपोर्ट गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आले नसले तरी पुढील कार्यवाही केली जात आहे.
गल्ली बोळ स्थानिकांनी केले सील
वाघोली येथे करोना संशयित रुग्ण सापडल्याने गावातील गल्ली बोळातील रस्ते स्थानिक तरुणांनी स्वयंस्फूर्तीने बंद केले आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला जात आहे. किंवा बाहेर जाणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे. हौसिंग सोसायटी परिसरामध्ये बाहेरील कोणत्याही व्यक्तीस येण्यास मज्जाव केला आहे.
रस्त्यावर शांतता
लॉकडाऊनच्या काळामध्ये भाजीपाला, किराणा माल खरेदी करण्यासाठी अनेक नागरिक विनाकारण बाहेर पडत होते. वाघोलीत करोनाचा रुग्ण सापडला असल्याची माहिती समजताच नागरिकांनी घराबाहेर पाऊल टाकले नाही. दुकाने सुद्धा बंद झाल्याने नागरिकांनी बाहेर जाणे टाळले. खरेदीसाठी वर्दळ असणाऱ्या वाघोलीतील रस्त्यांवर शांतता पसरली आहे.