नवी दिल्ली : जगात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दीड लाखाहून अधिक झाली आहे. जीवघेण्या कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 1,54,126 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 22 लाखांवर पोहोचली आहे. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 2,248,330 आहे. मागील काही दिवसांपासून अमेरिकेमध्ये कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे.
तर ज्याठिकाणावरून कोरोनाची सुरुवात झाली होती त्या चीनमध्ये पुन्हा कोरोनाने तांडव करण्यास सुरुवात केली आहे. इथे मृतांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या 24 तासांत चीनमध्ये 50 टक्यांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत चीनमध्ये 1290 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 4632वर पोहोचला आहे. तसेच संसर्ग झालेल्यांचा आकड्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाली. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 325 नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे चीनमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 82,692 वर पोहोचली आहे.
चीनमधील जीडीपीमध्ये 1976 विनाशकारी सांस्कृतिक क्रांतीनंतर आतापर्यंत मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2020 मध्ये पहिल्या तीन महिन्यांमध्ये 6.8 टक्यांची घट पाहायला मिळाली. यादरम्यान, कोरोना व्हायरसच्या महामारीचा सामना करण्यासाठी उचलण्यात आलेल्या अप्रात्यक्षिक उपायांमुळे जगभरातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये मंदीचं सावट दिसून येत आहे.