पिंपरी – भोसरी आणि दिघी परिसरातील एक महिला आणि तीन पुरुष अशा चार जणांचा करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णांची संख्या 39 वर पोहचली आहे. शहरात आत्तापर्यंत एकूण 52 जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
गुरूवारी महापालिकेने 99 संशयितांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले होते. त्याचा अहवाल गुरूवारी रात्री उशिरा प्राप्त झाला. त्यामध्ये एका महिलेसह चार जणांचा अहवाल करोना बाधित असल्याचा आला आहे.
बुधवारी (दि. १५) रात्री करोना बाधित रुग्णांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील ही 42 वर्षाची महिला रुग्ण आहे. तर,19, 31 आणि 33 वय असलेल्या पुरुषांचेही अहवाल करोना बाधित असल्याचे आले आहेत. ते देखील हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. चारही रुग्ण भोसरी आणि दिघी भागातील रहिवाशी आहेत.