वॉकहार्ट, शुश्रुषा, जसलोकनंतर भाटिया रुग्णालयही सील
मुंबई : मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता करोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार भाटिया रुग्णालयात घडला असतन आज काम करणाऱ्या 11 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ताडदेव परिसरातील भाटिया रुग्णालयात काल 14 जणांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आता आणखी 11 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता भाटिया रुग्णालयातील एकूण 25 जणांना करोनाची लागण झाली आहे.
दुसरीकडे मुंबईतील नायगाव परिसरातील एका पोलीस कर्मचाऱ्यालाही करोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत मुंबईतील भाटिया, वॉकहार्ट, सुश्रूषा, जसलोक या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अनेक रुग्णालय सील करण्यात आली आहेत.
दरम्यान, मुंबईत उच्चभ्रू सोसायट्यांसह झोपडपट्टीमध्येही करोनाने शिरकाव केला आहे. त्यानतंर आता डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलिसांसह इतर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना करोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे करोनाविरोधात लढा देणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण होवू लागल्याचे दिसून येत आहे.
धारावीत आणखी चौघांना लागण
राज्यात मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ही सर्वाधिक आहे. धारावी परिसरात आज आणखी चौघांना करोनाची लागण झाली आहे. तर यातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीतील एका पुरुषाला आणि दोन महिलांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यातील एक महिला ही शुश्रूषा रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तर सायन रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या एका 60 वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत धारावी परिसरात 47 जणांना करोनाची लागण झाली आहे. यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.