पुणे – करोनाबाधित रुग्णांवर करणाऱ्यात येणाऱ्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारे फसवे संदेश सोशल मीडियातून प्रसारित केले जात आहेत. सायबर चोरट्यांनी करोनाचा आधार घेऊन मदतीचे आवाहन करणारे संदेश पाठविण्यास सुरुवात केली आहे. अशा संदेशांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने केले आहे. करोनासारख्या परिस्थिीतीचाही सायबर चोरटे फायदा उठवत आहेत.
करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर मागील महिनाभरापासून देशातील व्यवहार टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आले. संपूर्ण देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. याही परिस्थितीत सायबर चोरट्यांनी सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन करणारे फसवे संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या संदेशात एक लिंक पाठविण्यात येत असून या लिंकमध्ये माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लिंकमध्ये बॅंक खात्याची गोपनीय माहिती भरल्यास त्याद्वारे चोरटे बॅंक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने पैसे लांबवू शकतात. हे प्रकार काही ठिकाणी घडले आहेत. अद्याप पुणे पोलिसांकडे अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद झाली नाही. मात्र, नागरिकांनी फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी केले आहे.
महिनाभरापूर्वी संपूर्ण देशभरात पेटीएम ऍप अद्ययावत करण्याची बतावणी करणारे संदेश पाठवण्यात आले होते. यातून बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेऊन अनेकांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले होते. पुण्यातही अशा प्रकारची फसवणूक मोठ्या प्रमाणावर झाली होती. पेटीएम अद्ययावत करण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी अनेकांची फसवूणक केली होती. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे अशा प्रकारचे शेकडो तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते.
सायबर पोलिसांचे निरीक्षण
पेटीएम अद्ययावत करण्याची बतावणी, परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून फसवणूक तसेच जुन्या वस्तू खरेदी विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर फसव्या जाहिराती टाकून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढते आहेत. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर सायबर चोरट्यांनी आता आर्थिक मदतीचे आवाहन करणारे फसवे संदेश पाठवण्यास सुरुवात केल्याचे निरीक्षण सायबर गुन्हे शाखेकडून व्यक्त करण्यात आले आहे.