कराड (प्रतिनिधी) – ऊसतोडणी कामगारांच्या स्थलांतरित होणाऱ्या टोळ्या रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. शिवाय स्थलांतरित होणाऱ्या टोळ्यांना इंधन पुरवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी यांच्यावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांचे स्थलांतर थांबविण्याचे आदेश राज्य शासन व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. मात्र, त्याचे पालन न केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे धुमाळ यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेठरे बुद्रूक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या होत्या. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यांची कारखानास्थळावर अथवा आहेत त्या ठिकाणी त्यांची सोय करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तशी सोय केली नाही. उलट त्या टोळ्या स्थलांतरीत होत होत्या. त्याची माहिती असूननही ती सांगितली नाही. त्यातील काही टोळ्या फलटणजवळ प्रवासदरम्यान आढळल्या. पोलिसांनी त्यांच्याकड विचारणा केली असता त्यांनी कृष्णा कारखान्याकडे ऊसतोडणीसाठी होतो असे सांगितले. त्यानंतर येथे चौकशी झाली.
त्यावेळी कृष्णा कारखान्याने त्यांना सध्या आहेत त्याठिकाणी थांबविणे व त्यांना सुविधा पुरवणे आवश्यक होते. मात्र, तसे काहीही केले नाही, असे तपासात समोर आले. त्याशिवाय ऊस तोडणी मजुरांना बीड जिल्ह्यात जाण्यासाठी त्यांच्या वाहनांना इंधन पुरविल्याचेही स्पष्ट झाले. परंतु, सध्य परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर रोखण्याचे निर्देश राज्य शासनासह जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी तपास कराड तालुका पोलीस करत आहेत