कराड शहर महाभयंकर करोनाच्या विळख्यात

शुक्रवार पेठ बनतोय हॉटस्पॉट; रविवारी वाढले सहा कंन्टेन्मेंट झोन; पालिकेची कसरत
कराड (प्रतिनिधी) –
करोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जिल्ह्यातील हॉटस्पॉट ठरत असलेल्या कराड शहरला करोनाने विळखा घातला आहे. जवळपास प्रत्येक प्रभागात करोनाचा शिरकाव झाला असून त्याला रोखण्यासाठी पालिकेला चांगलीच कसर करावी लागत आहे. शहरात रविवारी आठ रूग्ण वाढले असून येथील शुक्रवार पेठ शहरातील हॉटस्पॉट बनली आहे.

येथील शुक्रवार पेठेत नऊ, गुरुवार पेठेतील कंपाउंडर, मुजावर कॉलनी येथील महिला, गुरुवार पेठेतील आणखी एक पुरुष असे कराड शहरातील तब्बल 12 नागरिक बाधित ठरले आहेत. शहरात सध्या ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या पन्नासहून अधिक आहे. शनिवारी रात्री अचानक 12 रुग्ण वाढल्याने रविवारी शहरात खळबळ उडाली. शुक्रवार पेठ, भाजी मंडई, गुरुवार पेठ, रविवार पेठेत रुग्ण सापडल्याने पालिका व पोलीस प्रशासनाने बॅरिगेटस करून संबंधित परिसर सील केला. शहरात आणखी नवीन सहा कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे.

यात बनपुरीकर कॉलनी, रुक्‍मिणी विहार, रविवार पेठ-यादव गल्ली, अंडी चौक, मंगळवार पेठ, शनिवार पेठेतील रणजित टॉवर, पायऱ्या खालील भाग, रुक्‍मिणी प्लाझा भागाचा नवीन कंटेनमेंट झोनमध्ये समावेश झाला आहे. शुक्रवार पेठेत नगरसेवकाच्या घरातील नऊ जण एकाच वेळी करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्या परिसरात खळबळ उडाली आहे. नगरसेवक व त्यांचा मुलगा वगळता घरातील सर्वांनाच बाधा झाली आहे. संबंधित नगरसेवकाचा भाऊ व्यवसायासाठी सातारा, वडूज व कराड अशा भागात फिरत होते. त्यावेळी त्यांना संसर्ग झाल्याने घरात करोनाची लागण झाली असण्याची शक्‍यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. येथील भाजी मंडईतील श्री चेंबर्समधील रुग्णालयातील कंपाउंडर बाधित झाला आहे. संबंधित कंपाउंडर बाधित रुग्णावर उपचार करत होता. त्यांना इंजेक्‍शनही देत होता. त्याच्या माध्यमातून संबंधित कंपाउंडर बाधित ठरल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर मुजावर कॉलनीतील एक महिला बाधित झाल्याने मुजावर कॉलनीतील काही भाग सील करण्यात आला आहे. शहरातील करोना बाधितांचा वाढता आकडा पालिका व पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. यासाठी नागरिकांना प्रशासनाच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात करण्यात आले आहे.

रविवारी कराड तालुक्‍यातील 28 जण बाधित
कराड तालुक्‍यातील मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, 4 वर्षीय बालक, कोयना वसाहत येथील 5 वर्षीय बालक, कराड मंगळवार पेठेतील येथील 28 वर्षीय महिला, ओंढओडोशी येथील 41 वर्षीय पुरुष, तारुख येथील 33 वर्षीय पुरुष, शिवडे, उंब्रज येथील 55 वर्षीय पुरुष, कापील येथील 26 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 26 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 4 वर्षीय बालक, गोटे येथील 38, 17 वर्षीय युवती, वाकनरोड येथील 50 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी, कराड येथील 79 वर्षीय पुरुष, कुसूर येथील 65 वर्षीय महिला, कराड येथील 56 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 64 वर्षीय पुरुष, जाखिणवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, गोटे येथील 58, 41, 20, 24, 17, वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, पेठ येथील 75 वर्षीय पुरुष, सुपने येथील 60 वर्षीय महिला बाधित आढळलेल्या आहेत. हा बाधितांचा वाढता आकडा कराड तालुक्‍यातील लोकांच्यासाठी धोक्‍याची घंटा ठरत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.