मुंबई – कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच आज लॉक डाऊनच्या दहाव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेशी संवाद साधताना ‘येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा’ असं आवाहन केलंय.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनाबाबत राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना फडणवीस यांनी, ‘रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी लाईट बंद करून मेणबत्ती, दिवा अथवा मोबाईल फ्लॅशच्या उजेडात आपल्याला भारताच्या कोरोनाविरोधातील लढ्याला चिन्हांकित करायचं आहे. जनतेने पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.’ असं मत नोंदवलं.
मोदींच्या आवाहनाला विरोधाचा सूर
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कडाडून विरोध केला आहे. विरोधकांच्या प्रतिक्रियांमध्ये, मोदी यांनी जनतेच्या आरोग्य सुविधा, अन्नपाणी व रोजगार यांबाबत काही ठोस घोषणा करण्याची अपेक्षा असताना त्यांनी दिवा लावण्याचा सल्ला दिला. असा नाराजीचा सूर दिसून आला.