राजगुरूनगर : करोना विषाणू रोखण्यासाठी राजगुरूनगर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात अग्निशामक दलाच्या वाहनातून सोडियम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी करण्यात येत आहे. राजगुरूनगर शहरात करोना विषाणू बाधित रुग्ण नसले तरी खबरदारी म्हणून नगर परिषदेच्या माध्यमातून उपाययोजना सुरु करण्यात आली आहे.
शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शहरात २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात घरपोच सेवा देण्यासाठी नगर परिषद व काही सेवाभावी संस्थांचा पुढाकाराने किराणा व औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शहरात करोना विषाणूंचा प्रसार होऊ नये म्हणून सोडियम हायपोक्लोराईड औषधाची नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या माध्यमातून फवारणी केली जात आहे. वाडा रस्ता, बाजार पेठ आदी महत्वाच्या व गर्दीच्या ठिकाणावर औषध फवारणी करण्यात आली.