“हम आप के है कौन’ या चित्रपटातून आणि तत्पूर्वी “सुरभी’ या दूरदर्शनवरील शोमधून मराठी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे अलीकडील काळात सोशल मीडियावर व्यक्त केल्या जाणाऱ्या स्पष्ट-परखड मतांमुळे चर्चेत असते.याखेरीज अलीकडेच तिने “व्हॅट द फॉक्स’ हा आपला पहिलावहिला वेब शोही बनवला. या शोला चांगले यश मिळाल्यानंतर रेणुका आता एक मेडिकल कॉमेडी घेऊन रसिकांपुढे येणार आहे.
“स्टार्टिंग टेबल’ नामक या मेडिकल कॉमेडीचे दिग्दर्शन अभिनव कमल यांनी केले आहे. ही एक वेबसीरीज असून वास्तववादी घटना केंद्रस्थानी ठेवून तिची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. जगदीश चतुर्वेदी लिखित “इनव्हेंटिंग मेडिकल डिव्हायसेस’ या पुस्तकावर आधारलेली ही वेबसीरीज आहे.
रेणुकाने याबाबत सांगितले की, अभिनव आणि जगदीश यांच्यासोबत काम करणे हे एखाद्या पिकनिकप्रमाणे होते. यानिमित्ताने डॉ. जगदीश यांच्याकडून आरोग्य क्षेत्राविषयीची बरीच माहिती शिकायला मिळाली. सहा भागांच्या या वेबसीरीजची निर्मिती टेन मोशन आर्टस्ने केली आहे. यामध्ये डॉ. जगदीश चतुर्वेदी, कुरुश देबू, अनुष्का, राजेश पीआय, भरत चावला, जुई पवार, आदिती रावल, विक्रांत खट्टा, नेहा पाठक आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.