कॉंग्रेसच्या गदारोळामुळे कामकाज तहकुब
नवी दिल्ली – मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदारांना भाजपच्या वतीने बंगळुरू येथे ठेवण्यात आले आहे त्या आमदारांना भेटण्यासाठी गेलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या प्रकरणाचे आज राज्यसभेत जोरदार पडसाद उमटले. कॉंग्रेस सदस्यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करून त्यावर सरकारचे उत्तर मागण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्ष नायडू यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे कॉंग्रेस सदस्यांनी तेथे जोरदार गदारोळ केला.
अध्यक्षांच्या आसनासमोर जमून त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकुब करावे लागले. या विषयावर सदस्यांनी कोणतीही नोटीस दिली नाहीं त्यामुळे त्यांना हा विषय आज येथे उपस्थित करता येणार नाही असे नायडू यांनी सांगितल्यानंतर कॉंग्रेसच्या सदस्यांनी संताप व्यक्त करून त्यांच्या आसनासमोरच्या जागेकडे धाव घेतली. सुरूवातीला या गदारोळाकडे नायडू यांनी दुर्लक्ष केले. कितीही गदारोळ झाला तरी मी कामकाज तहकुब करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. पण त्यानंतर गदारोळ अधिकच वाढल्यानंतर नायडू यांचा नाईलाज झाला.