पुणे – मध्य रेल्वेंतर्गत धावणारी पनवेल एक्स्प्रेस पुन्हा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाकडून देण्यात आली. मागील अनेक महिन्यांपासून बंद असणाऱ्या या गाड्या पुन्हा केव्हा सुरू होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
पुणे-मुंबई मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यान सुरू असणाऱ्या तांत्रिक कारणांमुळे 31 मार्च या कालावधील दररोज धावणारी पुणे-पनवेल-पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहे. तर पुणे-भुसावळ-पुणे एक्स्प्रेस 31 मार्च या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मुसळधार पावसामुळे मंकी हिल ते कर्जतदरम्यानच्या मार्गिकेचे नुकसान झाले होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक कामे करण्यात येत होती. मागील चार ते पाच महिन्यांपासून या मार्गावरील रेल्वे गाड्या बंद होत्या. प्रशासनाकडून या मार्गाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
परंतु, प्रत्यक्षात हजारो नोकरदार, व्यावसायिक आणि विद्यार्थी ये-जा करत असणारी गाडी मागील अनेक महिन्यांपासून बंद ठेवली आहे. यामुळे प्रवाशांना नाहक फटका बसत आहे. त्यामुळे गाडी लवकरात लवकर पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.