एफडीएकडून चार औषध विक्रेत्यांवर कारवाई

मास्क, सॅनिटायझरची जादा दराने विक्री केल्या

पुणे – मास्क, सॅनिटायझरची जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यात चार विक्रेत्यांवर कारवाई करून पुढील आदेश येईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर शुक्रवारी (दि. 13) रात्री उशिरा आणखीन काही विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. त्यामुळे जादा दराने मास्कची तसेच बोगस सॅनिटायझरची विक्री होत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे ग्राहकांची लूट होत आहे. या संदर्भात नागरिकांनी विभागीय आयुक्‍तांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी “एफडीए’च्या अधिकाऱ्यांना संबंधितांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार “एफडीए’ने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

कोथरूडच्या मेट्रो मेडिको आणि गोखलेनगरच्या ओम मेडिकलमधून जादा दराने मास्कची विक्री होत असल्याचे आढळले. कोथरूडचे न्यू पूना केमिस्ट आणि म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेडिकल यांनी बोगस सॅनिटायझर्सची विक्री केल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे, अशी माहिती “एफडीए’चे सहआयुक्‍त एस. बी. पाटील यांनी दिली.

दरम्यान, सरसकट सर्वांनी मास्क वापरण्याची गरज नाही. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनाच “एन 95′ मास्कची गरज आहे. मास्कची गरज असल्यास डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करू नये. ही कारवाई सुरूच राहणार असून, जादा दराने मास्कची विक्री अथवा बोगस सॅनिटायझरची विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही सहआयुक्तांनी दिला.

केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍टच्या वतीने सर्व औषधविक्रेत्यांना मास्क आणि सॅनिटायझरची जादा दराने विक्री न करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही विक्रेत्याने जादा दराने विक्री केल्यास आणि त्यांच्यावर एफडीएने कारवाई केल्यास संघटना त्यांची पाठराखण करणार नाही.

– अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.