कन्हैय्या कुमारच्या विरोधातील खटला
नवी दिल्ली -जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्या खटल्याविरोधात राजकीय आणि न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार भाकपने केला आहे.
भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा कन्हैय्या सदस्य आहे. त्याच्या विरोधात खटला चालवण्याला दिल्लीतील आप सरकारने नुकतीच परवानगी दिली. त्यावरून राजकारण तापले आहे. भाकपनेही निवेदन जारी करून पक्षाची भूमिका मांडली आहे. कन्हैय्यावरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूंनी प्रेरित आहेत. त्यामुळे कन्हैय्या संबंधित प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडेल.
कन्हैय्याशी संबंधित व्हिडीओंमध्ये फेरफार झाल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच याआधी म्हटले होते. अचानकपणे त्यांचे मन परिवर्तन कसे काय झाले? राजकीय दबावापुढे झुकून केजरीवाल यांच्या सरकारने खटल्याला परवानगी दिल्याची बाब दुर्दैवी आहे, असे भाकपने म्हटले.
कन्हैय्याला खोट्या प्रकरणात गोवण्याच्या प्रयत्नांचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्याचा इशाराही त्या पक्षाने दिला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात चार वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. त्या घोषणाबाजीला कन्हैय्याने पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. त्यावरून त्याच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्ली पोलीस प्रयत्नशील होते. मात्र, त्यासाठीची परवानगी देण्याचा विषय आप सरकारपुढे अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता.