- शितल शिंदे यांना यंदाही डावलले जाण्याची शक्यता
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षदासाठी भोसरीतील सदस्याची वर्णी लावली जाणार हे जवळपास निश्चित असून त्यासाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगली आहे. तर निष्ठावंत गटाचे समजले जाणाऱ्या शितल शिंदे यांना यावर्षीही डावलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदेश पातळीवर “गॉडफादर’ नसल्यामुळे सध्या तरी शिंदे यांचे नाव मागे पडल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ सदस्यांची 26 फेब्रुवारी रोजी निवड करण्यात आली आहे. तर अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 6 मार्च रोजी अध्यक्ष निवडला जाणार आहे. सध्या महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. तर स्थायी समितीमध्येही याच पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे भाजपाच सदस्य अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. शहर पातळीवरील भाजपात सध्या तीन गट कार्यरत आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांचे दोन तर निष्ठावंतांचा तिसरा गट कार्यरत आहे. महापालिकेत झालेल्या अलिखित सत्ता वाटपानुसार पहिली अडीच वर्षे महापौरपद भोसरी विधानसभेकडे होते. तर तिसऱ्या वर्षी निष्ठावंताच्या रुपाने विलास मडिगेरी यांना संधी मिळाली.
सध्या महापौरपद चिंचवड विधानसभेकडे असल्याने स्थायीचे अध्यक्षपद भोसरीला मिळणार हे निश्चित मानले जात आहे. भोसरी विधानसभेतून स्थायी समितीसाठी तीव्र इच्छुक असलेल्या रवी लांडगे यांचा पत्ता कापण्यात आल्यामुळे महेश लांडगे समर्थकाची वर्णी या पदावर लागण्याची शक्यता आहे. यामध्ये संतोष लोंढे, भीमाबाई फुगे व सुवर्णा बुर्डे यांच्यामध्ये स्पर्धा रंगली आहे. संतोष लोंढे हे महापौरपदासाठी इच्छुक असतानाही त्यांना संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे लोंढे हे या पदासाठी आग्रही असून फुगे आणि बुर्डे यांची नावेही सध्या चर्चेत आली आहेत.
निष्ठावंत गटाचे शितल शिंदे हे गतवर्षी तीव्र इच्छुक होते. मात्र त्यांच्याऐवजी ऐनवेळी विलास मडिगेरी यांना संधी देण्यात आली. अध्यक्षपदासाठी शिंदे यांनी भरलेला अर्ज मागे घ्यावा, यासाठी थेट तत्कालीन मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत पुढील वर्षी संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र यावेळीही शिंदे यांच्यावर अन्यायच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निष्ठावंतापैकी बहुतांश नेत्यांनी शितल शिंदे यांना संधी द्यावी यासाठी आग्रह धरला असला तरी स्थानिक आमदाराच निर्णय घेणार असल्यामुळे भोसरीतील सदस्यालाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
निर्णयाची पुनरावृत्ती?
स्थायी समितीचे सदस्य ठरविताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सूचविलेली दोन नावे वगळण्यात आली होती. त्याऐवजी स्थानिक आमदारांनी सुचविलेल्या सदस्यांनाच संधी देण्यात आली. प्रदेश पातळीवरून अथवा निष्ठावंतांनी कितीही आग्रह धरला तरी तो कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता आहे. त्यामुळे स्थानिक आमदार जो निर्णय घेतील तोच कायम राहणार आहे. तर सत्तावाटपातील फॉर्मुल्यानुसार दोन वर्षे स्थायीच्या अध्यक्षपदाची संधी भोसरीला देण्यात येणार असल्यामुळे लोंढे, फुगे की बुर्डे अध्यक्ष होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.