वाई : सोनजाई डोंगरावरून पसरणी घाटाच्या पायथ्याला पाण्याच्या शोधात आलेले भेकर एका कोरड्या विहिरीत पडले. ही बाब निदर्शनास येताच काही प्राणीमित्रांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाने, प्राणीमित्रांच्या मदतीने या भेकरास कोरड्या विहिरीतून बाहेर काढत जीवदान दिले.
याबाबत माहिती अशी, पाण्याच्या शोधात असणारे एक भेकर शनिवारी रात्री पसरणी घाटाच्या पायथा परिसरातील एका कोरड्या विहिरीत पडले. ही बाब काही प्राणीमित्रांच्या निदर्शनास आली.
त्यांनी लगेच याबाबतची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वन क्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले. तसेच सह्याद्री प्रोटेक्टर्सचे डॉ. प्रशांत सूर्यवंशी, अंकुश पवार, समीर साळुंखे, महादेव पवार सचिन नाळे, पोपट साळुंखे, मच्छिंद्र नाळे, वनरक्षक वैभव शिंदे, सुरेश सूर्यवंशी, ओमकार सूर्यवंशी यांनी वनविभागाला सहकार्य करत विहिरीत पडलेल्या भेकराला सुखरुप बाहेर काढले.