कायदेशीर कारवाई करण्याचे सूतोवात
पुद्दुचेरी: मी माझ्या कारकिर्दीत अनेक किरण बेदी पाहिल्या. बेदी यांनी सरकारी कामकाजातील हस्तक्षेप थांबवावा यासाठी त्यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असे सूतोवाच पुद्दुचेरीचे मंत्री मल्लादी कृष्ण राव यांनी शुक्रवारी केले.
केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुद्दुचेरीतील कॉंग्रेस सरकार आणि नायब राज्यपाल बेदी यांच्यात वारंवार संघर्ष होत आहे. आता तेथील कॉंग्रेस सरकारने बेदी यांच्याविरोधात आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे राव यांनी मांडलेल्या भूमिकेतून स्पष्ट झाले. येथे पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस नेते असणाऱ्या राव यांनी बेदींवर टीकेची झोड उठवली. बेदी पुद्दुचेरी सरकारच्या कामकाजात ढवळाढवळ करत आहेत. त्यामुळे आमच्या सरकारच्या आणि केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत.
पुद्दुचेरीला निधी मिळू नये यासाठी त्या केंद्र सरकारच्या विभागांशी संपर्क साधतात. सीबीआय तपासाला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत त्या पुद्दुचेरीतील प्रामाणिक आयएएस अधिकाऱ्यांना धमकावतात. त्यांच्या विरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रतिकूल अहवाल पाठवतात, अशा आरोपांची सरबत्ती राव यांनी केली. दरम्यान, बेदी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. मी कुठलाही चांगला प्रस्ताव किंवा चांगली योजना रोखत नाही. माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.