नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसोबत आता मुलगी इवांका ट्रम्प आपल्या पतीसह भारत दौऱ्यावर येणार आहेत. इवांका ट्रम्प यांचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. दरम्यान, इवांका अनेकदा नरेंद्र मोदी आणि भारताची प्रशंसा करत असतात. डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया सोबत अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे जाणार आहेत.
अहमदाबादमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प जवळपास 22 किलोमीटरचा प्रवास रस्तामार्गाने करणार आहेत. जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मोटेरा स्टेडियममधील प्रत्येक कोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत असणार आहे. रोड शो दरम्यान एनएसजी कमांडो आणि अमेरिकेतील स्नायपर्स ठिकठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.