भाविकांकरिता दोन दिवस खुले राहणार दर्शन
जेजुरी- जेजुरी गडावर शिवरात्रदिनी शिवत्रिलोक दर्शन होणार आहे. भाविकांकरिता दोन दिवस खुले राहणार दर्शन होणार आहे. यासाठी देवसंस्थानकडून सुविधा पुरविल्या जाणार आहेत. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात शिवरात्रदिनी शंखनाद आणि हरहर महदेव अशा गर्जना होतात. असेच त्रिलोक दर्शन प्राप्त होणाऱ्या जेजुरीच्या शिवशंभू अवतरीत शिवमल्हार खंडोबा देवाच्या शिवरात्रदिनी मध्यरात्री वर्षातून एका वेळीस उघडण्यात येणाऱ्या त्रिलोक दर्शनाचा लाभ भविकांना घेता येतो. राज्यासह परराज्यातील भाविक दर्शनाकरिता मध्यरात्रीपासूनच रांगा लावतात. पुजारी, मानकरी, गावकरी आणि देवसंस्थान विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्री शिव गुप्तलिंग पाताळ शिवकैलास शिखर स्वर्ग आणि भूलोक हे नेहमीचे दर्शन विधिवत धार्मिक विधी पूजा झाल्यानंतर भाविकांना खुले करण्यात येते.
राज्यातील विविध जिल्ह्यातील शिवभक्त यावेळी भाविकांना अन्नदान वस्त्रदान करतात. मराठवाडा, विदर्भ येथून दर्शनाकरिता काठ्या येत असतात. एक दिवस बाहेरून येणाऱ्या भाविकांना तर एक दिवस जेजुरी पंचक्रोशीतील भक्तांना असे दोन दिवस दर्शनाकरिता खुले असते.
यावेळी देवसंस्थान आणि पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जेजुरी गड शिवलिंगाकार मृत्यूलोकी नाही दुसरे शिखर ही पौराणिक आरती संत नरहरी सोनार यांनी शिवरात्री दिनी लिहिली, असा इतिहास सांगितला जातो. आजही या ओळी मंदिरावर सुवर्ण अक्षरात लिहिल्या आहेत. भंडाऱ्याची उधळण आणि मार्तंड शिवमल्हारीचा नाम गजर करीत भाविक दर्शनला येत असतात.