उत्तरपत्रिका फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी 50 रुपये जादा मोजावे लागणार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने येत्या मार्च-एप्रिलच्या परीक्षापासून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकितप्रत (फोटोकॉपी) आणि पुनर्मूल्यांकनसाठी शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्हीसाठी अभ्यासक्रमनिहाय 50 रुपये शुल्क वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आता फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना वाढीव शुल्क आकारले जाणार आहे.
पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकारामध्ये उत्तरपत्रिकांची छायाप्रत उपलब्ध करून देण्याचा निर्णय 2009 पासून अंमलात आला. विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास त्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना आधी छायाप्रत घ्यावी लागेत, त्यामध्ये काही शंका असल्यास त्यानंतर पुन्हा पुनर्मूल्यांकनासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची पद्धत आहे. पहिल्यादांचा फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनसाठी अशा दोन्ही शुल्कात वाढ करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेश विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फोटो कॉपीसाठी अव्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता 100 रुपये, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 150 रुपये शुल्क आकारण्यात येत होते. तसेच उत्तरपत्रिकेच्या पूनर्मूल्यांकनसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता 150 रुपये, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 200 रुपये शुल्क आकारण्यात येत होते. आता नव्या निर्णयानुसार फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव परीक्षा व मूल्यमापन मंडळाने व्यवस्थापन परिषदेपुढे मांडला होता. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शुल्कवाढीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर शुल्कवाढीचे परिपत्रक परीक्षा विभागाकडून नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यावरून आता विद्यार्थी संघटनांकडून विरोध होणार असल्याचे दिसून येत आहे.
शुल्कात पुढीलप्रमाणे वाढ
नव्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका फोटोकॉपीसाठी आता 100 रुपयांऐवजी 150 रुपये, तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 150 रुपयांऐवजी 200 रुपये शुल्क निश्चित केले. तसेच, उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता 150 रुपयांऐवजी 200 रुपये, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 200 रुपये 250 रुपये शुल्क निर्धारित केले आहे.
वर्षाला साडेतीन लाख अर्ज
पुणे विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर केल्यानंतर फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. विद्यापीठाच्या वर्षातून दोन परीक्षा होतात. साधारणपणे एका परीक्षेसाठी फोटोकॉपीकरिता 1 लाख 80 हजार ते 2 लाख, तर पुनर्मूल्यांकनासाठी 1 लाख 40 हजार ते दीड लाखांपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज येतात. त्यावरून एका परीक्षेसाठी फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकनासाठी संयुक्तपणे साडेतीन लाखांच्या आसपास विद्यार्थी अर्ज करतात, अशी माहिती आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.