बीजिंग : चीनमध्ये साऊथ वेस्ट विद्यापीठासहित अनेक विद्यापीठांची नवी शैक्षणिक सत्रं स्थगित करण्याचा निर्णय चिनी अधिकाऱ्यांनी घेतला आहे. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रांचा मुद्दा आरोग्य सचिव प्रीती सुदन यांनी चीनच्या राजदुतांकडे अलीकडेच उपस्थित केला होता.
या विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गांमध्ये हजर व्हावे, नाहीतर त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल असे चीनमधल्या विद्यापीठांनी सांगितले होते. घातक करोना विषाणूच्या फैलावामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेऊन नवे शैक्षणिक सत्र स्थगित करण्याचा निर्णय चीनच्या राज्य परिषदेने घेतला आहे, अशी माहिती चिनी दुतावासाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला दिली आहे.
याविषयी विद्यार्थ्यांना त्यांची विद्यापीठे माहिती देतील. चीनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात हजर होण्याच्या सूचना या विद्यापीठांनी केल्या होत्या.
इराणमध्ये करोना विषाणूबाधेची लागण झालेल्या दोन रुग्णांचा काल मृत्यू झाला. या विषाणूबाधेचे हे इराणमधले पहिले बळी आहेत. मरण पावलेल्या दोन व्यक्तींनी कधीही परदेश प्रवास केला नव्हता, अशी माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुखांनी दिली.
हे दोन जण इराणच्या कोम भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांना रोगप्रतिकारविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. “कोविड्-19′ या विषाणू संसर्गाचे मध्यपूर्व आशियातले देखील हे पहिले आणि चीनबाहेरचे सातवे आणि आठवे बळी आहेत.
चीनमधील औषधांचा तुटवडा…
करोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनमधून येणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे करोना विषाणूंवर देशांतर्गत औषधे निर्माण करण्यासंदर्भात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांबरोबर नीती आयोगाने काल चर्चा केली. नीती आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष, अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात घोषणा केल्यानंतर ही बैठक झाली. औषध निर्माण संदर्भात विविध पैलूंवर चर्चा झाली. जेणेकरून चीनच्या औषधांवर अवलंबून राहता येणार नाही.