आ. आशुतोष काळे : विविध विभागांच्या आढावा बैठकीत केल्या सूचना
कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा विकासनिधी अखर्चित राहणार नाही, याची पंचायत समितीच्या सदस्यांनी काळजी घ्यावी. अपूर्ण असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करून 31 मार्च पूर्वी हा निधी विकासकामांसाठी खर्च होईल, यादृष्टीने उपाय योजना कराव्यात, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी आढावा बैठकीत दिल्या.
यावेळी तालुक्यातील 29 शाळांच्या 72 खोल्या निर्लेखित करण्यात आल्या असून, त्यापैकी 25 शाळा खोल्यांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती पंचायत समितीच्या सदस्य व अधिकाऱ्यांनी यावेळी आ. काळे यांना दिली. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, कोपरगाव नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेऊन येणाऱ्या अडचणींचा आढावा आ. काळेंनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
कोपरगाव शहराच्या अडचणींचा आढावा घेताना आ. काळे यांनी कोपरगाव शहरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंजूर करून आणलेल्या 42 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती जाणून घेत शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्त करावेत, अशा सूचना ननगरपालिका प्रशासनाला दिल्या. तसेच नाट्यगृहासाठी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी कोपरगाव शहरातील टपरीधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरातील मोक्याच्या जागेवर व्यावसायिक गाळे उभारण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाचे पैसे त्यांना व्यापाऱ्यांकडून वेळेत मिळाले पाहिजे. संचालक मंडळाने शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका ठेवून बाजार समितीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, असे आ. काळे म्हणाले.
जंगली जनावरे लोकवस्तीत यायला लागले आहेत. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत असून, त्यांच्या पिकांचेही नुकसान होत आहे.
याकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहून या जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा. तसेच जंगली जनावरांमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वेळीच पंचनामे करून मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना आ. काळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीस पं. स. सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सोनाली साबळे, कारभारी आगवण, उपसभापती अर्जुनराव काळे, माजी सभापती अनसूयाताई होन, सदस्य मधुकर टेके, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.