गणेश घाडगे
नेवासा तालुक्यात खासगी शिकवणी वर्गांचे फुटलेत पेव
नेवासा – आपल्या पाल्याला परीक्षेत जास्त गुण मिळाले पाहिजेत, अशी मानसिकता सर्वच पालकांची सध्या दिसून येत आहे. त्यामुळे पाल्यांना शाळेव्यतिरिक्त खासगी शिकवणी वर्गास पाठविण्याचे फॅड सध्या पालकांच्या डोक्यात शिरले आहे. त्यामुळे या खासगी शिकवणी वर्गाच्या अतिरिक्त फीचा भार पालकांच्या डोक्यावर पडत आहे. त्यामुळे तालुक्यात या खासगी शिकवणी वर्गांचे पेव फुटले आहेत.
एकट्या नेवासा शहर, नेवसा फाटा, सोनई, प्रवारा संगम, भेंडा, कुकाणा, घोडेगाव, सलाबतपूर, शिरसगावमध्ये खासगी शिकवणी वर्गांची सख्या ही शेकडोंच्या घरात आहे. मात्र यातून शासनाला रुपयाचाही कर मिळत नाही. तालुक्यात शिकवणीचा धंदा जोमत आहे. केजीपासून पीजी पर्यंतच्या शिकवण्या घेतल्या जातात. छोट्या क्लासेसपासून कॉर्पोरेट क्लासेसनेही तालुक्यात ठाण मांडण्यास सुरवात केली आहे.
नेवासा तालुक्याची ही स्थिती असली, तरी जिल्ह्याचा आकडा मात्र हजारोंच्यावर आहे. खासगी क्लासेस चालक विद्यार्थ्यांकडून महिन्याकाठी 300 रुपयांपासून 5 ते 10 हजारांपर्यंत फी आकारात आहेत. यातून लाखो रुपयांची रक्कम गोळा केली जाते. मात्र या क्लास चालकांकडून शासनाचा कर सर्रास बुडवला जात आहे. या खासगी क्लासेसबाबतची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्धच नसल्याने शिकवणीचा धंदा जोमत आहे.
त्यामुळे या क्लास चालकांचेही चांगलेच फावते आहे. पात्रता नसलेले अनेकजण मुलांना शिकवत आहेत. पालकांना आकर्षित करणाऱ्या जाहिराती केल्या जात आहेत. त्यामुळे या भूलभुलैय्यास पालक फसत आहेत. पहाटेपासूनच यांच्या क्लासेसचा दरवाजा उघडला जातो. पहाटे सहा वाजल्यापासून सुरू झालेले हे क्लास रात्री 10 पर्यंत वेगवेगळ्या बचेसमध्ये सुरू असतात. त्यामुळे लहान मुलांचे बालपण या क्लासेसमुळे हरवत चाचलले आहे. त्यांच्या नैसर्गिक मानसिक आणि शारीरिक वाढीवर परिणाम होत आहे.
क्लासच्या नावाखाली सध्या सुरू असलेल्या या नव्या मायाजालला पालकही बळी पडत असून, समाजातील आपली प्रतिष्ठा उंचावण्यासाठी आपल्या पाल्यालाही क्लास लावावाच, या भावनेतून ते मुलांना क्लासला पाठवित आहेत. आर्थिक परिस्थिती नसतानही समाजातील इभ्रत जपण्यासाठी पालकही याचे बळी ठरत आहेत.
दहावीत पाल्य, पालकांना मनस्ताप
नववीची परीक्षा देण्यापूर्वीच काही क्लास चालकांकडून दहावीच्या मार्गदर्शनाचे फोन पालकांना येत आहेत. तुमच्या मुलाच्या भविष्याचा विचार करा… आमची एवढी मुले टॉपर ठरलीत, अशा मार्केटिंगसह सातत्याने संपर्क केला जात असल्याने दहावीतील पाल्याचे पालक अक्षरशः हैराण होत आहेत. मार्केटिंगचा फंडा क्लासकडून वापरला जात असल्याने याबाबतही जागरूकता ठेवणे आवश्यक आहे.
क्लासचालकांकडूनच घेतले जाते क्रेडिट
मुळातच हुशार असलेला एखादा विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतो. खासगी क्लासकडून मात्र या मुलाच्या गुणाचे क्रेडिट स्वतःकडे घेत त्याच्या जिवावर 50 हून अधिक प्रवेश मिळवले जातात. कोणत्याही क्लास चालकाकडील सर्वच्या सर्व मुले गुणवत्ता यादीत का येत नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे.