राष्ट्रवादीचा आरोप : 520 कोटींची निविदा, 200 कोटींचा घोळ
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा केला असून त्याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांची साथ आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. एका पाणी मीटरची किंमत 1 लाख 8 हजार रुपये असून ही यंत्रणा कार्यन्वित करण्यासाठी लागणारा 25 लाख रुपयांचा जनरेटर तब्बल 3 कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. या कामासाठी 520 कोटींची निविदा राबविली असून त्यात 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. आयुक्तांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केले आहेत की, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात पाणी मीटर बसविण्यात येत आहेत. या कामासाठी 515 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर, पाच वर्षांसाठी पाच कोटी रुपये इतका देखभाल दुरूस्तीचा खर्च येणार आहे. यामध्ये 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप प्रशांत शितोळे यांनी केला.
केंद्रातील स्मार्ट सिटीचे प्रमुख कुणालकुमार व राज्याचे प्रमुख नितीन करीर यांच्याकडे तक्रार केली जाणार आहे. त्याचबरोबर तक्रार राज्याच्या अँटी करप्शन ब्युरोकडे करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी हा देशपातळीवरील सर्वात मोठा भ्रष्टाचार असून ठेकेदाराच्या बाजूने करारनामा केल्याचा आरोपही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
स्मार्ट सिटीच्या कामासाठी जी निविदा मागविली होती त्यातील काही वस्तूंचा दर जादा होता तर काहींचा कमी होता. मात्र प्रत्येक वस्तूचा दर कमी न करता निविदेतील एकूण वस्तूंच्या रकमेबाबत चर्चा करून अंदाजित रकमेपेक्षा चार टक्के कमी दराने निविदा स्विकारली. हा निर्णय शहराच्या हिताचा आणि स्मार्ट सिटीतील सर्व सदस्यांच्या सहमतीने घेतला आहे. ठरलेल्या वेळीच ठेकेदाराला पैसे देण्यात येणार आहे. यामुळे या निविदा प्रक्रियेत कोणताही भष्ट्राचार झालेला नाही.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिका