नवी दिल्ली – देशाच्या घाऊक महागाई निर्देशांकातही जानेवारी महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे. आधीच्या महिन्यात हा निर्देशांक 2.59 टक्के इतका होता तो आता 3.1 टक्के इतका झाला आहे. अन्न पदार्थांच्या किंमती 2.41 टक्क्यांवरून थेट 11.51 टक्के इतक्या वाढल्या आहेत.
अन्य वस्तुंमध्येही 2.32 वरून 7.8 टक्के इतकी वाढ झाली आहे. वाणिज्यमंत्रालयाने शुक्रवारी जानेवारी महिन्याचा डाटा प्रसिद्ध केला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अन्न पदार्थांमध्ये भाज्यांच्या किंमतीत 52.72 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. ही वाढ मुख्यत: कांद्याचे दर वाढल्यामुळे झाली आहे. तर बटाट्याच्या किंमतीत 37.34 टक्के इतकी वाढ झाली आहे.
मागच्याच आठवड्यात किरकोळ विक्रीचा महागाई दर जाहीर झाला होता. त्यातही सहा वर्षांतील उच्चांकी वाढ नोंदवली गेली असून हा दर 7.59 टक्क्यांवर गेला आहे. मे 2014 मध्ये महागाईचा दर 8.33 टक्के इतका होता आता सध्याचा महगाईचा दरही त्याच दिशेने जाताना दिसतो आहे, त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.