वॉशिंग्टन – भारताची जेवढी उर्जेची म्हणजेच इंधनाची गरज असेल ती गरज आम्ही पुर्ण भागवू शकतो या महत्वाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याची मोठी क्षमता आहे असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार लॅरी कडलोव यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या नियोजित भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यात लष्करी सामग्रीविषयीही अनेक महत्वाचे करार होऊ शकतात असे त्यांनी नमूद केले. भारत अमेरिकेकडून 2.6 अब्ज डॉलर्स किंमतीची लष्करी हेलिकॉप्टर्स घेणार आहे. त्या करारालाही या भेटीत चालना मिळू शकते. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार विषयक अडथळे दूर झाले तर दोन्ही देशांमधील व्यापाराला खूपच चालना मिळू शकते असे ते म्हणाले. भारताला उर्जेची गरज आहे आणि आमच्याकडे उर्जा भरपुर आहे असे ते म्हणाले.
आमची या आधी जेव्हा पंतप्रधान मोदींबरोबर चर्चा झाली होती त्यावेळीही आम्ही त्यांना सांगितले होते की तुम्हाला किती इंधन लागते ते सांगा आम्ही ते पुरवू असेही त्यांनी यावेळी नमूद केले. गेल्या वर्षी अमेरिकेने भारताला 8 अब्ज डॉलर्सचे इंधन पुरवले आहे. भारताची नैसर्गिक वायुची गरज लक्षात घेऊन त्याच्या पुरवठ्यासाठी अमेरिकेत भारत-अमेरिका नॅचरल गॅस टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.