नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या नव्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवले आहे. रामलिला मैदानावर येत्या 16 तारखेला हा शपथविधी सोहोळा संपन्न होत आहे. आम आदमी पक्षाचे निमंत्रक गोपाल राय यांनी सांगितले की आजच आम्ही मोदींना निमंत्रणाचे पत्र पाठवले आहे.
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे सर्व नवनिर्वाचित आमदार आणि दिल्लीतील सर्व भाजप खासदारांनाही या सोहोळ्यासाठी निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. राय म्हणाले की हा केवळ दिल्लीशी संबंधीत कार्यक्रम असल्यान अन्य राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अथवा बाहेरील राज्यांतील अन्य कोणत्याही नेत्यांना या शपथविधीसाठी निमंत्रणे देण्यात आलेली नाहीत असेही राय यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. रविवारी सकाळी दहा वाजता हा शपथविधी सोहोळा होत असून त्यासाठी केजरीवालांनी वृत्तपत्रांमध्ये जाहीरात देऊन सर्व दिल्लीकरांनाही या शपथविधीसाठी आमंत्रण दिले आहे.