जलसंपदा विभागाकडून अभ्यास
पुणे – टेमघर धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात जलसंपदा विभागाकडून अभ्यास करण्यात आला. यामध्ये कृष्णा तंटा लवादाचे पाणी साठविण्याचा कोटा, टेमघर धरण दुरुस्ती आणि अतिरिक्त पाण्याचा दाब सहन करण्यासाठी करावी लागणारी बळकटीसाठीची कामे आदी कारणांमुळे टेमघर धरणाची उंची वाढविता येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
टेमघर धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे चार टीएमसी इतकी आहे. धरणे भरल्यानंतर पाण्याचा विसर्ग केला जातो. त्याऐवजी या धरणामध्ये अतिरिक्त पाणीसाठा करण्यासाठी धरणाची उंची वाढविता येऊ शकते का, अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यावर जलसंपदा विभागाकडून अहवाल तयार करण्यात आला. या धरणाची उंची वाढविल्यास अतिरिक्त पाण्याचा भार धरणाला सहन होण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
त्यामुळे तांत्रिक अडचण उभी राहिली आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाच्या आदेशानुसार प्रत्येक धरणासाठी पाणी कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीकोटा वाढविण्याबाबत या धरणाची उंची एक ते दीड मीटरने वाढविल्यास सुमारे एक ते दीड टीएमसी पाणीसाठा वाढू शकणार आहे. परंतु, या धरणाची उंची वाढविल्यास अतिरिक्त जमीन पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे; तसेच अतिरिक्त पाण्याचा दाब धरणावर येणार असल्याने धरणाला बळकटी देण्याची तांत्रिक अडचण उभी राहणार असल्याचे जलसंपदाकडून सांगण्यात आले.