मच्छिमार कृती समितीची मागणी
मुंबई : शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या विनायक मेटे यांनी स्मारकाच्या कामात केलेल्या कोट्यवधी रूपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी उच्चस्तरीय चौकशी समिती (एसआयटी) द्वारे करावी, अशी जोरदार मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिवस्मारक समिती बरखास्त करून नव्याने समिती स्थापन करावी तसेच शिवस्मारकासाठी नव्याने जागा निश्चित करावी, याकडेही समितीने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. शिवरायांच्या नावाने केलेला भ्रष्टाचार शिवप्रेमी म्हणून आम्ही सहन करणार नाही. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करावी व दोषींवर कारवाई करावी. अरबी समुद्रातील 42 एकराच्या बेटावर शिवस्मारकाची एकही वीट न रचता 80 कोटी रूपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. हा पैसा कसा खर्च केला याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सांगितले.
अरबी समुद्रातील प्रस्तावित शिवस्मारकाकडे जाणारा मार्ग धोकादायक आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर 23 जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे जुनी समिती बरखास्त करून नवी समिती स्थापन करावी. तसेच या समितीने तज्ञांकडून व जनतेकडून सूचना मागवून स्मारकासाठी नवी जागा निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली.