मोदींनी जिनपिंग यांना पत्र लिहून व्यक्त केली सहवेदना
नवी दिल्ली – चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कठिण प्रसंगात चीनला सहाय्य करण्याची तयारी दर्शवली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना लिहीलेल्या पत्रामध्ये मोदी यांनी ही तयारी दर्शवली आहे. चीनचे अध्यक्ष आणि चीनी नागरिकांप्रती मोदींनी सहवेदना व्यक्त केली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
चीनमध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणामुळे आतापर्यंत एकूण 811 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आजारी पडलेल्यांची संख्या 37 हजारावर पोहोचली आहे. या विषाणूच्या प्रादुर्भावाचा केंद्रबिंदू हुबेई प्रांत जरी असला तरी चीनमधील बहुतेक प्रांतांमध्ये आणि किमान 25 देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग पसरला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.
शी जिनपिंग यांना लिहिलेल्या पत्रात मोदींनी आतापर्यंत मरण पावलेल्या नागरिकांबद्दल दुःख व्यक्त केले आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी चीनला भारताकडून मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. चीनमध्ये अडकलेल्या 650 भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी चीनच्या प्रशासनाने जी मदत केली त्याबद्दल मोदींनी जिनपिंग यांचे आभार मानले आहेत.